कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?




कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?

कसं असतं आभाळातलं इंद्रधनुष्य?
त्याचे सप्तरंग दिसतात तरी कसे?
खरंच का हो असतात चंद्राच्या अंगावर..
पांढरे-पांढरे शुभ्र छान-छान ससे?
रंगीबेरंगी म्हणजे कशी झळकतात,
मस्त मोराची मऊ-मऊ पिसे?

सारे रंग तुमच्याच भोवती..
माझं तर आकाश पण काळंच असे...
पण नसेना का उजेड माझ्यासाठी,
त्यावाचून माझं अडतंय कुठे?
डोळ्यांनीच का पहावं सगळं?
माझी तर बोटंच झालीत माझे आरसे...
आवाजाची दुनिया तर माझीच आहे,
साथीदार आहेत कान माझे,
सारे दिसते मनास माझ्या,
हळूवार फ़क्त घ्यावे कानोसे.....
गंध भरतो रिक्त जागा,
श्वासातही परिमळ वसे..
विश्वासू हे असती सारे,
उणीव कुणाची कधी ना भासे....
अनुकंपा तर नकोच आहे..
जगणे माझे जीवनगाणे...
विझलेल्या त्या डोळ्यांतूनही,
सौंदर्याचेच दिसतील ठसे.........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: